केळशी गाव आहे अरुंद गल्ल्यांचं. वाट विचारत विचारत महालक्ष्मीच्या देवळाकडे निघालो. देवळापुढे एकदम रस्ता संपला. दोन्ही बाजुला झाडी. समुद्रावरुन येणारा खारा वारा जाणवत होता. डावीकडे दुरवर माड – पोफळ पोहोचलेले. त्यातुन डोकावणारा याकुतबाबांच्या दर्ग्याचा मीनार. समोर सुबकसं महालक्ष्मीचं देउळ. गोल घुमटाचं. प्रवेशद्वारावर नगारखाना. फरसबंद परिसर. आवारात चाफ्याची झाडं. चाफ्याची झाडं आणि देउळ यांना एकमेकांमुळे शोभा येते. एक दुस-याशिवाय अपुरं वाटतं. त्या निरव शांत स्थळी जणु महालक्ष्मी तप आचरत आहे.
आंजर्ल्याला साठ्यांकडे अगदी घरगुती जेवण झालं. केळीचं आडवं पान. भात-पिठलं, डांगराचा गोळा, लोणचं आणि आंबट ताक. काकू रांधायला आणि पट्टेरी चड्डी घातलेले काका वाढायला. (मला गौरीच्या पुसाळकारांची आठवण झाली) सगळ्यांनी आडवा हात मारला.
आंजर्लाला खाडीवरचा पुल ओलांडला. मॊठा देखणा परिसर आहे. एकीकडे चकाकणारा करडा अरबी समुद्र. दोन्ही बाजुला पुळणी, सुरुची झाडं. माडापोफळीच्या बागा, दुरुन दिसणारं कड्यावरच्या गणपतीचं देउळ.
पुढे हरणेची कॊळी वस्ती. इथॆ किना-यालाच समुद्र खोल आहे. किना-याला लागुन कोळ्यांची घरं, बाहेर ओढुन ठेवलेल्या होड्या. एवढ्याश्या पुळणीवरुन समुद्रात पोहणारी २० – २५ कोळी पोरं अगदी सी गल्स च्या टोळीसारखी डुंबत होती.
कर्दं उजवीकडे ठेवुन घाट चढायला लागलो. आसुदच्यापुढे व्याघ्रेश्वर. तिन्ही बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं, नदी किनारचं टुमदार देउळ. गाभा-याला हेमाडपंथी शिखर. सभामंडप मात्र कौलारु. आवारात असलेले अवशेष आणि काळे चिरे गतवैभवाची साक्ष देतात.
डोंगरांच्या ओंजळीतुन वाहाणारी झुळुक उन्हाळ्याचा विसर पाडत होती. `शंभो हर हर’ म्हणत आम्ही दापोली पोलादपुर मार्गे महाबळेश्वरी निघालो.




